JNU मध्ये ABVP आणि AISA च्या समर्थकांमध्ये हाणामारी, अनेक विद्यार्थी जखमी
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (एआयएसए) या विद्यार्थी संघटनांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री कॅम्पसमध्ये हा राडा झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत कुंज स्थानकावर गोंधळ झाल्याची माहिती मिळाली असता, पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, एका सेमिनारवरून दोन्ही गटात वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेने या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ABVP ने लेखी तक्रार दाखल केली आहे. AISA शी संबंधित एका विद्यार्थ्यानेही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या मते दोन्ही गटांचा एकमेकांवर त्यांच्या बैठकीत अडथळा आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ABVP ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत विद्यार्थी संघटना आहे तर AISA ही CPI(ML) ची संबंधीत संघटना आहे. दोनही विद्यार्थी संघटनांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे वाद झाले आहेत.
जेएनयूवर झालेला हल्ला...
जेएनयूमध्ये 5 जानेवारी 2020 रोजी संध्याकाळच्या सुमारास काही जणांनी लाठ्या काठ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केली होती. यावेळी पोलिसांनी काहीही न करता बघ्याची भूमिका घेतली होती असा आरोप करण्यात आला होता. या हल्ल्याच विद्यार्थी संघटनेची आइशी घोषसह 35 जण जखमी झाले होते.