रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सहाव्या दिवशीही कायम, सरकारचे दुर्लक्ष

Agitation continues against reliance Nagothane project

Update: 2020-12-02 12:15 GMT

रायगड - लढेंगे और जितेंगेच्या गगनभेदी घोषणा देत लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वात २७ नोव्हेंबरपासून रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मटेरियल गेटसमोर सुरू करण्यात आलेले आंदोलन सहाव्या दिवशीही कायम आहे. स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त यांनी आक्रमकपणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी देखील रिलायन्स व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांच्यात कोणतीही चर्चा न झाल्याने जिद्दीने पेटलेल्या आंदोलकांनी लढा अधिक व्यापक करून जिंकू किंवा मरू, करो या मरो या भूमिकेत आता मागे न हटण्याचा निर्धार केला आहे.

या आंदोलनात कडसुरे गेटवर मुलाबाळांसह वृद्धांचा व महिलांचा लक्षवेधी असा सहभाग आहे. ठिय्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे, मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकारी व मंत्री तसेच नेतेमंडळी इकडे फिरकत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रिलायन्स व्यवस्थापनाची भूमिका

दरम्यान रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रत्येक मागण्यांच्या अनुषंगाने प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे, रिलायन्स व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट करताना नोकरी देण्याच्या मागणीत तथ्य नसून अतिरिक्त नोकऱ्या देणे बंधनकारक नाही असे म्हटले आहे, शिवाय सदरच्या मागण्या अवास्तव व अवाजवी असल्याचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

Tags:    

Similar News