काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवय ; अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा वाद

राष्ट्रवादीत ट्विटर वॉर रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामधील हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

Update: 2024-02-06 02:49 GMT

Mumabai: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pwar ) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या (NCP) दोन्ही गटात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, "शेवटची निवडणूक आहे असं सांगतील आणि भावनिक आवाहन करतील. पण तुम्ही त्याला बळी पडू नका." तसेच "शेवटची निवडणूक कधी येईल हे मला माहिती नाही," असेही ही अजित पवार म्हणाले होते.यावरुन शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत सडकून टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांची टीका:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर तीव्र टीका केली. "ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणले, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवले त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो. पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही. तुम्ही भावनाशुन्य झाला आहात," असे आव्हाड म्हणाले.

अजित पवार यांची प्रतिक्रिया:

आव्हाड यांच्या टीकेला अजित पवार यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. "काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझे मत आहे की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही," असे पवार यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर:

"नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात? शरद पवारांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या कधीतरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते," असे आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.

Tags:    

Similar News