अमर जवान ज्योतीपाठोपाठ महात्मा गांधींची प्रिय धुनही हद्दपार
केंद्र सरकारने इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण करण्यात आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून महात्मा गांधींची प्रिय धुन हटवण्यात आली आहे.
दोन दिवसांपुर्वी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत होत्या. त्यापाठोपाठ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा शेवट महात्मा गांधींच्या अबाईड विथ मी या धुनने केला जातो. मात्र यंदाच्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आवडत्या अबाईड विथ मी या ख्रिस्ती भजनाची धून वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शनिवारी लष्कराने जारी केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसिध्दपत्रिकेतून ही बाब उघड झाली.
प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभावेळी सर्व दलांना आपापल्या बराकीमध्ये परतण्यासाठी बिटिंग द रिट्रीटद्वारे अधिकृत संदेश दिला जातो. त्यानंतर लष्कराची तीन्ही दले आपापल्या बराकीमध्ये जातात. यावेळी पारंपारिक धुन वाजवली जाते. त्यामध्ये महात्मा गांधींना प्रिय असलेल्या अबाईड विथ मी या धूनचा सामावेश होता. मात्र यंदाच्या कार्यक्रमातून ही धून वगळण्यात आल्याची माहिती लष्कराने प्रसिध्द केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून समोर आली.
स्कॉटिश कवी हेन्री फ्रान्सिस लाईट यांनी लिहीलेली धून महात्मा गांधींच्या आवडत्या भजनांपैकी एक होती. ती 1950 पासून प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात वाजवली जात होती. परंतू यंदा सारे जहाँ से अच्छा ही धून वाजवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जय जनम भूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन अॅरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढाए जा, ए मेरे वतन के लोगों या धूनचा सामावेश असणार आहे. तर केंद्र सरकारने इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीला हलवून तिचे विलिनीकरण राष्ट्रीय युध्द स्मारकातील ज्योतीत करण्यात आले. त्यावरून देशभर विविध प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात होत्या. तर माजी सैनिकांनी यावर संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता महात्मा गांधी यांची आवडती धून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून हद्दपार केल्याने देशभरात काय प्रतिक्रीया उमटतात हे पाहावे लागणार आहे.