सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ठरली

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी सुनावणीची तारीख जाहीर केली आहे.;

Update: 2023-09-22 07:34 GMT

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणी वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊन कायदेशीर सल्ला घेतला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी 25 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणी घेणार आहेत.

18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आठवडाभरात पुढची सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले होते. या दिल्ली दौऱ्यात त्यांनी कायदेशीर सल्ला घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता राहुल नार्वेकर यांनी पुढील सुनावणी ही 25 सप्टेंबर रोजी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सुनावणीत कशा पद्धतीने कारवाई होणार? आणि विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार की पुढील तारीख देणार? याची उत्सुकता कायम आहे.

सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं होतं?

14 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या सुनावणीनंतर कागदपत्रांच्या आदलाबदलीसाठी आठवडाभराचा वेळ देण्यात आला होता. मात्र 18 सप्टेंबर रोजी सर्वोच न्यायालयात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष वेळकाढू पणा का करत आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्याबरोबरच आठवडाभरात सुनावणी घेऊन किती कालावधीत हा निर्णय घेणार? याचे वेळापत्रक सादर करावे, असे निर्देश दिले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 3 ऑक्टोबर रोजी वेळापत्रक सादर करणार की नाही? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News