CAA आणि NRCच्या मुद्द्यावर देशभरात आंदोलन झाले होते आणि त्यानंतर कोरोनामुळे या विषय मागे पडला होता. पण आता प.बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांनी कोरोनाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर निर्वासितांना CAA अंतर्गत नागरिकत्व दिले जाईल अशी घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये अमित शाहांनी ही घोषणा केली आहे. या रॅलीमध्ये अमित शाहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली. प.बंगालची निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जी जय श्रीराम म्हणतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच प.बंगालमध्ये भाजप पुढचे सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला आहे.
CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा. या कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माचे जे लोक ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आले आहेत, तसेच ज्यांच्यावर त्या देशांमध्ये धार्मिक अन्याय झाला आहे अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे. पण या कायद्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. मुस्लिम समाजाला यातून का वगळ्यात आले असा सवाल करत देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलनही करण्यात आले होते.