एसटीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची व्यथा, हाती आलं खासगी गाड्यांचं स्टिअरिंग
गेल्या जवळपास ३ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलना दरम्यान बीड आगारातील 229 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे या बडतर्फ कर्मचाऱ्यांवर आता मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. बीड आगारातील कर्मचाऱ्यांच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग तर काही जण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहेत.
गेल्या 6 वर्षांपासून एसटीत वाहक म्हणून सेवा देणारे हे आहेत श्याम पतंगे, मागील अडीच महिन्यांपासून पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनात यांचा सहभाग होते. त्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांमध्ये त्यांचा देखील समावेश आहे. जेष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर झालेल्या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांना तोडग्याची अपेक्षा होती. मात्र बैठकीनंतर अपेक्षा भंग झाला आहे. कामावर येण्याची इच्छा असली तरी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करून घेऊ नये असे आदेश असल्याने, पतंगे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ श्याम पतंगे यांच्यावरच नाही तर त्यांच्यासारख्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांची अशी परिस्थिती झाली आहे. बीडच्या एसटी आगारात चालक म्हणून शंकर निराळे सेवा देतात, माञ त्यांच्यावर देखील सध्या घरगुती वाहनावर बदली चालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. इतर महामंडळांना जसे वेतन दिले जाते, तेच वेतन आम्हाला का नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एसटी बंदमुळे केवळ कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट झाली नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटी सेवा पूर्ववत होणे आता गरजेचे बनले आहे, असे मत आता सर्वच स्तरातून व्यक्त होते आहे.