अयोध्येत रामजन्मभूमीच्या निकालानंतर काही अधिकारी, नेते यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आहे. पण असाच प्रकार महाराष्ट्रातही घडल्याचा आरोप झाला आहे. समृद्धी महामार्गालगत काही सरकारी अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत,त्यांची नावं जाहीर करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत ही मागणी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात वेगाने पूर्ण केला जातो आहे. पण प्रकल्पाच्या आसपास अधिकाऱ्यांनी आधीच जमिनी खरेदी करुन ठेवल्या होत्या, या आरोपात कोणतीही तथ्य नाही, असे लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाल्याचे उत्तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.