"सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या" मलिक यांच्या कारवाईवरुन यशोमती ठाकूर यांचा इशारा
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यावरून संताप व्यक्त करत 'सरकार बनवायची घाई असेल तर शिवाजी पार्कात या' असा इशारा राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिला आहे.
नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामध्ये यशोमती ठाकुर म्हणाल्या की, "ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली झाली असेल तर शिवाजी पार्कात या! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जण एकत्र भेटू. तसेच एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७०चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.", अशा शब्दात यशोमती ठाकुर यांनी भाजपवर टीकास्र सोडले.
नवाब मलिक यांच्यावर ईडी च्या या कारवाईनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच नवाब मलिक यांच्या कारवाईवरून अनेक नेते यावर आपापल्या शब्दात प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.