अनेकांनी 'हर्षद मेहता स्कॅम' ही वेब सिरिज पाहिली असेल. हर्षद मेहताचा सगळा घोटाळा उघडकीस आणणारी महिला पत्रकार सुचेता तुम्हाला आठवते का? त्याच सुचेता दलाल यांनी आता दुसऱ्या घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी 12 जूनला एक ट्वीट करत या संदर्भात हिंट दिली होती...
आणखी एक घोटाळा असा आहे जो उघडकीस येणं कठीण आहे. सेबीकडील ट्रॅकिंग यंत्रणेकडं असलेल्या माहितीच्या बाहेर हे सर्व आहे. एका समुहामध्ये मोठा फेरफार सुरु आहे. यासाठी परदेशी कंपन्यांना हाताशी धरलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य असून अजुनही काहीच बदललेलं नाही.
असं सुचेता यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर आज 14 जूनला अदानी समुहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. यावरुन दलाल यांनी दिलेली हिंट खरी मानली जात आहेच त्याचबरोबर 'हर्षद मेहता स्कॅम' प्रमाणे हा घोटाळा झालाय आहे का? जर हा घोटाळा झाला तर मार्केटमधील हा 'बिग बूल' कोण? असा सवाल उपस्थित होतो.
दरम्यान NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासलळे आहेत. या तीनही कंपन्यांची अदानी समुहामध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार या तीनही कंपन्याचे अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशनमध्ये 08. 03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 6.82 टक्के तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये 3.58 टक्के गुंतवणूक आहे.
कोणत्या कंपन्यांवर कारवाई?
अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीन कंपन्यांवर NSDL ने कारवाई करत या कंपन्यांचे खाते गोठवले आहेत.
का झाली कारवाई?
अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीनही कंपन्यांच्या खातेदारांबाबत पुरेशी माहिती नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात कंपनीकडे माहिती मागवण्यात आली होती. ही माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्यानं या कंपनीवर कारवाई केली आहे.