सुशांतसिंह आत्महत्या की त्याची हत्या सीबीआयने सांगावे? अनिल देशमुख, गृहमंत्री
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली.;
सुशांतसिंहची हत्या झाल्याची शंका उपस्थित करून गोंधळ माजविण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आली. सीबीआयच्या तपासाला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. सुशांतसिंह प्रकरणात नेमकं काय झालं हे गृहमंत्री या नात्यानं अनेकजण आपल्याकडं विचारणा करतात. सुशांतची हत्या झाली की त्यानं आत्महत्या केली ,असा प्रश्न विचारतात. त्यामुळे सीबीआयनं चौकशी अहवाल जाहीर करून सुशांतच्या मृत्यू नेमका कशानं व कसा झाला हे जाहीर करावं. सीबीआयनं चौकशी अहवाल जाहीर केल्यास त्याचे चाहते व महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल,असेही ते म्हणाले.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं १४ जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी लिखित स्वरूपात काहीच न सापडल्यानं त्याच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्यानं जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडमध्ये ठरवून काम दिलं जात नसल्याच्या कारणामुळं तो तणावाखाली होता. नेमक्या कोणत्या कारणामुळं सुशांत तणावाखाली होता, हे शोधण्यासाठी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. सुशांतला ओळखणाऱ्या, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. परंतु सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानतंर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सोपवण्यात आला होता.