एसटी महामंडळाचा कारवाईचा बडगा; ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Update: 2021-11-10 03:14 GMT

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे अर्थात एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढून देखील एसटी संघटना संपावर ठाम आहेत. त्यामुळे मंगळवारी एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

दरम्यान, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे, राज्य शासनाच्या या निर्णयाचा संपकरी कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी मुंडण करीत निषेध केला आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे. गाव-खेड्यातील प्रवासी एसटीवरच अवलंबून आहेत.संपाच्या काळात प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर कामावर रुजू होण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे देखील प्रचंड हाल झाले त्यामुळे वारंवार आवाहन करून देखील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने महामंडळाने अखेर कारवाईला सुरुवात केली आहे.

एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.  राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते. 

Tags:    

Similar News