PSI मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसीपी गायकवाड यांच्याकडे
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास एसीपी भारत गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप झाल्याने, एका कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास दिल्याने चर्चेला उधान आलं आहे.;
पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून, अनिल मुळे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मुळे यांनी हिंगोली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांच्याशी केलेल्या संभाषणाची ही क्लीप असून यात क्लीपमध्ये त्यांना पोलीस उप अधीक्षक शशिकांत सातव व विक्रम साळी यांनी एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा केल्याचा उल्लेख केला आहे.
रामदास पाटील यांनी पोलिसांनी या घटनेचा निष्पक्ष तपास करावा तसेच अनिल मुळे हे व्यसनाधीन होते, एका महिलेसोबत काही दिवसापूर्वी अनिल मुळे यांचा वाद झाला होता ते प्रकरण पूर्णतः मिटल्यानंतर देखील अनिल मुळे यांची बदनामी करण्याकरता व्हॉट्सअपवर काही आक्षेपार्ह मजकूर टाकत असल्याचा आरोप रामदास पाटील यांनी केला.
अमरावती पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी गळफास घेऊन 13 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. दरम्यान मुळे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्याकडे दिला आहे. मात्र या प्रकरणात 2 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर आरोप असल्याने त्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तपास दिल्याने चौकशी कशी होणार हा मुद्दा उपस्थित होत आहे.