जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञाताने निर्घृण खून

Update: 2021-11-22 03:03 GMT

नाशिक :  काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञाताने निर्घृण खून केल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. प्रवीण काकड असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पंचवटी परिसरात म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव लिंक रोड वरील हॉटेल रोहिणी नजीक तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रवीण काकड हा तरुण मित्रांसोबत रोहिणी हॉटेलजवळ मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येऊन धारदार हत्याराने प्रवीणवर वार केले. यात प्रवीणचा जागीच मृत्यू झाला.

प्रवीण एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याच्यावर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाला असावा, असा संशय आहे. त्याच्या मृतदेहाजवळ मद्याच्या बाटल्या आढळून आल्यात. मयत प्रवीणचे वडील नाशिक पोलीस खात्यात नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच वडील गणपत काकड निवृत्त झाले होते. प्रवीणच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags:    

Similar News