संतापजनक : नाशिकमध्ये विधवा महिलेचे तोंड काळे करून काढली धिंड.
विधवा महिलेचे तोंड काळे करून धिंड काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.;
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे या गावात विधवा महिलेचे तोंड काळे करत तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पतीच्या निधनानंतर दशक्रिया विधीसाठी मुलांसोबत आलेल्या महिलेसोबत हा घृणास्पद प्रकार करण्यात आला आहे. "हिच्या अंगात देवी आली आहे. तिची पूजा करा तिची मिरवणूक काढा" असे म्हणत गावातून मारहाण करत धिंड काढली असल्याची माहिती सदर महिलेने फिर्यादीत दिली आहे.
या गंभीर प्रकरणामध्ये सुरवातीला गुन्हा दाखल केला गेला नव्हता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या हस्तक्षेपानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्यानंतर सदर आरोपींवर वडनेर भैरव या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटना ही अंधश्रद्धेतून घडली असल्याचा आरोप करत आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे लावण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदुगडे यांनी केली आहे…