आजीच्या साडीवरून ही जगात होऊ शकतं युद्ध
एकीकडे इस्त्राईल-पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. हमासकडून इस्त्राईलवर तर इस्त्राईलकडून हमासवर बॉम्ब हल्ले सुरू आहेत. मात्र हे सगळं सुरू असतानाच आजीच्या साडीवरूनही जगात युद्ध होऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नेमकं त्याचं कारण काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...;
इस्त्राईल-पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. एकमेकांवर बॉम्बहल्ले होत आहेत. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक बेघर झाले आहेत. गाझा पट्टीतल्या रुग्णालयावरही हल्ला करण्यात आलाय. त्यामध्ये जवळपास 500 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण हे सगळं एका बाजूला सुरू असतानाच मिरर नाऊच्या कार्यकारी संपादक श्रेया धौंडियाल यांनी एक ट्वीट केलंय. त्यासोबत त्यांनी त्यांच्या शो चा एक व्हिडीओ जोडला आहे. यामध्ये अँकरच्या साडीच्या रंगावरून इस्त्राईली प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली.
श्रेया होस्ट करत असलेल्या शोमध्ये इस्त्राईली प्रवक्त्याला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना इस्त्राईली प्रवक्त्याने म्हटले की, तुम्ही परिधान केलेला साडीचा रंग हा हिरवा, लाल आणि काळा आहे. तो तुम्ही जाणीवपुर्वक परिधान केला आहे. आमचा रंग निळा आणि पांढरा आहे. त्याचा आदर करणे आवश्यक आहे. मात्र यावेळी श्रेया यांनी म्हटले की, आमच्या देशामध्ये साडीच्या रंगावरून भेदभाव केला जात नाही. मी माझ्या आजीची साडी परिधान केली आहे. जी सध्या जीवंत असती तर 105 वर्षांची असती. ती इस्त्राईल आणि हमासशी संबंधित नव्हती. त्यामुळे तिची साडी ही कोणत्याही देशाचं समर्थन करणारी नाही. मात्र गाजामध्ये रुग्णालयावर हल्ला झाल्याने 500 लोकांचा मृत्यू झाला, हा गुन्हा आहे. मी काय परिधान करावं, हे मी ठरवणार, मला काय बोलायचं आहे ते मी बोलणार आणि मी सत्य बोलण्यासाठी इथं बसले आहे, असं श्रेया यांनी म्हटलं आहे.
तसेच ट्वीट करत श्रेया म्हणाल्या, माझ्या आजीच्या साडीमुळे माझे इस्त्रायली पाहुणे नाराज झाले. त्यावरून मी निशब्द झाले. खरंच असे वेगवेगळ्या देशातील लोक आजीची साडी परिधान केल्याने नाराज झाले तर भविष्यात आजीची साडी युद्धाचं कारण ठरू शकते, असं म्हटलं जातंय.