पोळ्याची मिरवणूक काढणाऱ्या दलित बांधवांवर बहिष्कार, पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
राज्यात एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. कोरोनानंतरचे उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना धुळे जिल्ह्यात मात्र पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहेरगाव येथे पोळ्याला बैल पळवले म्हणून दलित बांधवांवर गावाकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला आहे. दलित लोक बैल पोळा साजरा करु शकत नाहीत, असा आक्षेप घेत काही जणांनी आम्हाला रोखले असा आरोप काही तरुणांनी केला आहे. पण सरपंचांनी यासंदर्भातले आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात सर्व दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिले आहे. पोळ्याला मिरवणुकी दरम्यान वाद झाल्यानंतर गावातील लोकांनी मिळून दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे जीवनावश्यक वस्तु देखील दिल्या जात नाहीत, असा आरोप दलित बांधवांनी केला आहे. पण मेहेरगावच्या सरपंचांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवून गावातील वातावरण बिघडवण्याचे काम समाजकंटकांकडून सुरू असल्याचा आरोप देखील सरपंचांनी केला आहे.
धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी या दोघांनी सोमवारी गावात जाऊन दोन्ही गटांची समजूत काढली. गावातील सर्व व्यापाऱ्यांना सूचना देत कुठल्याही प्रकारे दुजाभाव करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.