राज्यात 21 जुलैला झालेल्या अतिवृष्टीने कोकणासह अनेक भागात महापूर आला होता. याच महापुरात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावचा पूल वाहून गेला. जगाशी संपर्क ठेवण्यासाठी गावकऱ्यांना हा एकमेव दुवा होता. पण बाव नदीवरील हा फुट ब्रिज महापुरात वाहून गेला. आता पूर ओसरून आठवडा उलटला आहे. पण अजूनही इथे नदी ओलांडण्याची कोणतीही सोय नसल्याने हे गाव जगापासून तुटले आहे.
गावातील लोकांना अत्यावश्क सेवेसाठी, रेशनींगसाठी, ग्रामपंचायतीची कामे करम्यासाठी मारळ, देवरुख या गावांमध्ये जावे लागते. पण आता रस्ताच नसलयाने गावकरी हवालदिल झाले आहेत.
स्थानिक आमदार, खासदार पूरग्रस्त गाव म्हणू भेट देण्यास आले, पण पूल नसल्याने नदीच्या पलिकडूनच त्यांनी गाव पाहिले.
यातच गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्यावर उपचार कसे करणार? कोरोनाचा थैमान असल्याने आरोग्यचा प्रश्न गंभीर आहे. व्यावसायिकांचे नुकसान होते आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म वैगरे भरता येत नाहीयेत.
त्यातच गावातील अनेक शेतकऱ्यांची नदीकाठी असलेली शेती पाण्याखाली गेली आहे. तर गावातील काही भागात दरड कोसळुन चिखलाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुले या गावातील जे लोक नोकरीनिमित्त मुंबईत आहेत त्यांनी मुंबईत बैठक घेउन निवधे गावचा फुटब्रिज लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. आमच्या गावात असणारे आई- वडिल, गावकरी यांची होणारी फरफट थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.