#गावगाड्याचे इलेक्शन : पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार विजयी
ग्रामपंचायत निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील भादली गावात इतिहास घडला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीत एका तृतीयपंथीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंजली पाटील (गुरू संजना जान) असे विजयी झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. तिने 'रिक्षा' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तिची रिक्षा सुसाट धावली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांना तिने मागे सोडले आहे.
अंजली पाटील हिने वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवली. तिला 560 मते मिळाली आहेत. ग्रामस्थांच्या सुख-दुःखात साथ देणे, अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे, अशा स्वरुपाची तिची ओळख असल्याने तिला ग्रामस्थांनी उमेदवार म्हणून कौल दिला. "लोकांनी भरभरून मत दिली त्यांची आभारी आहे, आपण गावात विकास करु" असे त्यांनी म्हटले आहे.
भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंजली हिने वॉर्ड क्रमांक 4 मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल केली होती. सुरुवातीला तिची उमेदवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाकारली होती. मतदारयादीत तृतीयपंथी म्हणून तिच्या नावासमोर 'इतर' असा उल्लेख असल्याने तिला सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करता येणार नाही, असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते. या विरोधात अंजलीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्याठिकाणी न्यायालयाने तिला दिलासा देत तिची उमेदवारी वैध ठरवली होती.