वाघिणीच्या शोधात एका वाघाची 3 हजार किलोमीटर भटकंती
प्रेयसीच्या शोधासाठी वणवण भटकणाऱ्या तरुणांच्या कहाण्या आपण कायम ऐकतो...पण सध्या एक वाघ चर्चेत आला आहे कारण वाघिणीच्या शोधासाठी या पठ्ठ्याने आतापर्यंत तब्बल ३ हजार किलोमीटर जंगल पालथे घातले आहे.
तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेला सी-1 वाघाचे गेल्या काही महिन्यांपासून अस्तित्त्व आढळलेले नाही. म्हणून सी-1 वाघ हा आपल्या मादीच्या शोधात अजिंठा किंवा यावल अभयारण्यात असल्याचा अंदाज बुलडाणा वन्यजीव वन परिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांनी व्यक्त केला आहे. तर ज्ञानगंगा अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रप कॅमेऱ्यामधील फोटो पुढील दहा दिवसांनी काढले जाणार असल्याने तो नेमका कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळू शकेल.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील 'सी-1' वाघाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचा परिसर राहण्यासाठी निवडला. या भ्रमंतीदरम्यान त्याने तब्बल आठ जिल्ह्यांमध्ये प्रवास केल्याने त्याचे 'भटकंती ' असेही नामकरण करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि तेलंगणाजवळील अदिलाबादपर्यंत त्याने भटकंती केली आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासात कधी मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण झाला नाही. त्यामुळे वाघिणीच्या शोधात त्याने ही भ्रमंती केल्याचा निष्कर्ष वनाधिकाऱ्यांनी काढला आणि त्याच्यासाठी अभयारण्यात वाघिणीला सोडण्याचा विचार करण्यात आला. त्यासाठी समिती देखील गठित करण्यात आली. सुमारे वर्षभरापूर्वी सी-1ला लावण्यात आलेले रेडिओ कॉलर काढण्यात आले असून रेडिओ कॉलरची बॅटरी संपल्यामुळे आणि वाघावरील अभ्यास पूर्ण झाल्याने ते काढण्यात आला आहे .सी-1 वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येत असून पुढील दहा दिवसांनी ट्रप कॅमेऱ्यांमधील फूटेज काढले जाणार आहे .तसेच त्याचे अस्तित्त्व अजिंठा पर्वत रांगेत किंवा यावल अभयारण्यात असल्याचा अंदाज वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.