'कुणी घर देतं का घर' म्हणणाऱ्या पारधी समाजातील व्यक्तीचा व्यवस्थेने घेतला बळी

देशातील प्रत्येक कुटूंबाला घर मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र घरकुल बांधून मिळावे आणि घरकुलाचे उर्वरित हप्ते मिळावेत, यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाच्या व्यक्तीने उपोषण सुरु केले होते. मात्र प्रशासनाने उपोषणकर्त्याकडे लक्ष न दिल्याने उपोषणकर्ता आप्पाराव भुजाराव पवार यांचे निधन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Update: 2022-12-04 12:13 GMT

शासनाच्या लालफितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असतं याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच उपोषणकर्त्याच्या थंडीने काकडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पारधी समाजातील वृध्दाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच झालेल्या मृत्यूला जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासनाची दिरंगाई? याची चौकशी करण्याची मागणी कुटूंबियांकडून करण्यात येत आहे.

आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत होते. मात्र या उपोषनकर्त्या व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. तर आमच्या कुटूंबातील व्यक्तीच्या मृत्यूला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे भटक्या समाजातील नागरिकांनी आपला हक्कही मागू नये का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Tags:    

Similar News