भारत देश मुळात अनेक राज्यांमध्ये विविध संस्कृती व विविध भाषांनी नटलेला देश आहे. स्वातंत्रपूर्व काळात देश वेगवेगळ्या संस्थानिकांमध्ये विभागलेला होता. पण स्वातंत्र्यानंतर या सर्व संस्थानिकांना एकत्र करून एक देश एक घटना या सूत्रात बांधून ठेवण्याची मुख्य जबाबदारी कायदेतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रामुख्याने होती. डॉ. बाबासाहेबांचे कार्य इतके प्रचंड होते की भारत देशच नव्हे तर संपूर्ण जग त्यांच्या विचारांचे पाईक झाले.
डॉ. बाबासाहेब राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात प्रचंड व्यस्त असत आणि समाज उद्धारासाठी सतत कार्यरत असत. हे सर्व करत असतांनाही बाबासाहेबांचे संगीतावर निरातिशय प्रेम होते. संगीतात जात- पात धर्म हे भेदभाव नसतात. ७ स्वर, २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे. चर्म वाद्य, तंतू वाद्य, सुषिर वाद्य, घन वाद्य ह्याची मोठी परंपरा भारतीय संगत क्षेत्राला आहे. बाबासाहेबांना संगीताची खूप आवड होती. तबला व व्हायोलिन हे त्यांचे आवडते वाद्य. विशेषत: व्हायोलिनचे गंभीर,गहीरे व करूण स्वर म्हणजे त्यांच्या जीवनाचे सारच त्यांना वाटत असावे !
बाबासाहेबांचे हे संगीतप्रेम लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगीत संस्था पाच वर्षांपासून दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. कार्यक्रमाच्या बाबतीत डॉ. हर्षदीप कांबळे सांगतात की, डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती. त्यामुळे आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . तसेच पहाटे सुमधुर शास्त्रीय संगीत आपल्याला ध्यानधारणाच्या (विपश्यना)अवस्थेत नेते.
भीमांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून जगविख्यात कलाकारांनी बाबासाहेबांना वाद्यसुरातून आदरांजली वाहिली आहे.
ही अनोखी आदरांजली दरवर्षी पहाटे ६ वाजता अर्पण करण्यात येते. यावर्षीच्या महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रमाची सुरूवात उस्ताद उस्माव खॅा साहेबांच्या सतारीने राग बसंत बुखारी या रागाने व साथ संगत तबला वादनात पं. मुकेश जाधव यांनी तीन तालच्या बंदिशीत केली. सकाळी सूर्योदयापूर्वी बाबासाहेबांना शास्रीय संगीतातून आदरांजली वाहणारी ही सतत पाच वर्ष चालणारी सांगितिक परंपरा केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळींवरही वैशिष्टयपूर्ण ठसा उमटावणारी घटना ठरली आहे.