हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील खुडज शिवारातील शेतातील एका गोठ्याला आग लागून या दुर्घटनेमध्ये जांभरून आंध येथील एका शेतकऱ्याच्या 10 शेळ्यासह बैलजोडी ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ही आग 9 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास लागली.
यात संबंधित शेतकऱ्याचे दहा क्विंटल सोयाबीन,शेती साहित्य,सर्व जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. जांभरुन आंध येथील शेतकरी शांताबाई भिमराव मोरे यांच्या खुडज शिवारातील शेतामध्ये गोठा आहे. या गोठ्याला आग लागल्याने त्यांचा संसार पूर्णपणे उघड्यावर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सदरील गोठ्याला ही आग दिव्यामुळे लागली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून आज महसूल व प्रशासनाच्या वतीने याठिकाणी पंचनामा करण्यात आला आहे.