भारत आज विज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती करत असला तरी अजूनही देशाच्या विविध भागात अनेक लोकांवरील अंधश्रद्धेचा पगडा कमी झालेला नाही. याबाबतच्या धक्कादायक घटना समोर येतच असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील कोशम्बी जिल्ह्यात एका व्यक्तीने देवीला प्रसन्न करण्य़ासाठी आपली जीभ कापून अर्पण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जीभ कापून घेणारी व्यक्ती ३८ वर्षांची आहे आणि त्याचे नाव संपत आहे. सध्या संपतवर कोशम्बीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संपत आणि त्याची पत्नी या मंदिरात शनिवारी आले होते. मंदिरात येण्याआधी त्यांनी गंगेमध्ये स्नान केले. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि मंदिराच्या प्रवेश द्वारावर त्याने जीभ कापून टाकली. शुक्रवारी रात्री संपतने मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती त्याच्या पत्नीने दिली आहे.
दरम्यान संपतने कोणत्या कारणासाठी जीभ कापली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण देवीला प्रसन्न करण्यासाठी जीभ कापण्याच्या अनेक घटना याधीही घडल्या आहेत. देशात शिक्षण आणि विज्ञाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी अनेक ठिकाणी अंधश्रदधेपायी लोक स्वत:ला किंवा इतरांना दुखापत करुन घेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार केले जाते, पण अजूनही अनेकवेळा असे प्रकार समोर येत आहेत.