शुक्रवारी रात्री ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री राज्याला कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबद्दल संबोधित करत होते त्याचवेळी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालाय आणि कोविड सेंटरमधील वीज पुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याने एका रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. जीव गेल्याने रुग्णालयातील 25 रुग्णांचे प्राण टांगणीला लागले होते. तर ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एका कोविड रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले. हा धक्कादायक प्रकार तब्बल दीड तास चालल्याने कोविड सेन्टरमधून रुग्ण बाहेर आले होते.
मलकापुरातील उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे व्हेंटिलेटरवरील 35 वर्षीय प्रेमसिंग राजपूत या रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. रात्री 9 वाजेच्या दरम्यान या रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने कोविड सेंटर मधील रुग्ण अक्षरशः बाहेर येऊन श्वास घेत होते...तर अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन रुग्णांपैकी एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला.
रात्री पावणे अकरा वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. कोविड रुग्ण विलागीकरण कक्षाला नगराध्यक्ष हरीश रावळ यानी भेट दिली तेव्हा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कोविड रुग्णाच्या विलागीकरण कक्षासाठी नेमून दिलेला सिक्युरिटी गार्ड झोपलेला होता. तर कोविड पॉझिटिव्ह प्रत्येक रुग्णाचे एक - दोन नातेवाईक विलागीकरण कक्षात भरती असलेल्या रुग्णाच्या बेडखाली झोपल्याचे दिसले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नित्याचा प्रकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रुग्णालयातील जनरेटर तीन ते चार महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने वेंटिलेटरवरील रुग्णाला जीव गमवावा लागला. पण याची जबबदारी घ्यायला कोणीही तयार नाही. याबाबत तहसीलदार स्वप्नाली डोईफोड़े यांना फोन केला असता तो स्विच ऑफ होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नाफड़े हे आपल्या वैयक्तिक कमानिमित्त अकोला येथे गेले होते. ते रात्री 3 वाजेपर्यंत रुग्णालयात आले नव्हते. एकूण प्रशासकीय गोंधळामुळे आणखी एक बळी गेला आहे.