दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल, आदित्य ठाकरेंच्या विधानाची चर्चा
आदित्य ठाकरे यांनी 2024 निवडणकीबाबत केलेल्या विधानाची चर्चा चांगलीच रंगली आहे.;
राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना मोठा निधी मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे सरकार असल्यामुळे केंद्र सरकार निधी वाटपात राज्यावर अन्याय करते, असा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येतो. त्यापार्श्वभुमीवर 2024 नंतर दिल्लीतूनही शिवसेना खासदारांना मोठा फंड आणता येईल, असे विधान करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार वाद पेटला आहे. दरम्यान शिवसेनेने गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यापार्श्वभुमीवर 2024 च्या निवडणूकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना देशभर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वि.दा.सावरकर सभागृहाचे तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंडच्या माध्यमातून नदी किणारा विकसीत करणे, डायलेसिस सेंटरचे उद्घाटन आणि औद्योगिक क्षेत्रातील 55 कोटींच्या रस्त्याच्या कामाचे काँक्रीटीकरण या कामांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, रविंद्र चव्हाण, राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रवी फाटक,जगन्नाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांसाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पहावी लागत होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. तर अशाच प्रकारे दिल्लीतूनही निधी आला पाहिजे, असे सांगितले. तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मी गोव्यात प्रचार करत होतो. इतर राज्यातही शिवसेना निवडणूक लढवत आहे. तर 2024 च्या लोकसभा निवडणूकीबाबत संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे 2024 नंतर दिल्लीतूनही शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणता येईल, अशे सूचक विधान केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई माझी आई आहे तर कल्याण डोंबिवली मावशी असल्यामुळे मावशीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाईल. मात्र दरम्यान आदित्य ठाकरे यांनी 2024 च्या निवडणूकीनंतर दिल्लीतूनही मोठा फंड आणता येईल या विधानातून शिवसेनेचे पुढचे लक्ष दिल्ली असल्याचे सूचित केले.
आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे केंद्रात सत्ताबदल होणार की शिवसेना पुन्हा भाजपसोबत संसार थाटणार या प्रश्नाला येणाऱ्या काळात उत्तर मिळेल.