नांदेड (Nanded)शहरापासून जवळच असलेल्या बोंढार हवेली (Bondar haveli)येथील मागासवर्गीय समाजातील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी या निर्घृण हत्येतला ९ वा आरोपी २४ व्या दिवशी नांदेड पोलिसांनी पकडला आहे.
१ जून रोजी बोंढार हवेली गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पहिल्यांदा जयंती काढल्याचा राग मनात धरून जयंतीसाठी पुढाकार घेणाऱ्या अक्षय भालेराव या तरुणाचा गावातील एका लग्नाच्या वरातीत जातीय मानसिकतेतून खंजरने भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी व प्रत्यक्षदर्शींनी केला होता.
त्यानंतर अक्षयचा भाऊ आकाश भालेराव याच्या तक्रारीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ८ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले होते. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी आज बाबूराव तिडके या ९ व्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाईल..