93 हजार एसटी कामगारांना मिळणार सप्टेंबरचा पगार; मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाखांचा निधी मिळाला

Update: 2021-10-12 14:13 GMT

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. एसटी महामंडळाला मानव विकास योजनेतील 231 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगार लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगारांचा दसरा गोड होणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतूकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी "मानव विकास कार्यक्रम" अंतर्गत योजना राबविली जाते. यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो. याच योजनेच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य सरकारकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे बाकी होते. सोबतच इंधन किमतीची दरवाढ, किलोमीटरमधील तफावत, चालक व वाहक यांचे वेतनवाढ आणि बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च यांचा विचार करुन प्रलंबित निधीमध्ये वाढ करून अनुदान देण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी बैठक घेतल्या होत्या,परब यांनी एस.टी. महामंडळासाठी एकूण 428 कोटी 88 लाख 62 हजार 200 इतका निधी मंजूर करुन घेतला. दरम्यान मे- 2021मध्ये एसटी महामंडळाला पहील्या टप्यातील 197 कोटी 58 लाख 40 हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम याआधी एस.टी. महामंडळाला मिळाली होती. दरम्यान आज दुसऱ्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख 22 हजार 200 रूपयांचा निधी एस.टी. महामंडळाला देण्याबाबत निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल 93 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

Tags:    

Similar News