डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला शुक्रवारी(२० ऑगस्ट) आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हत्येच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? असे सवाल करत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन रायगड जिल्हा अंधश्रध्दा निर्मुलन समिती ने शुक्रवारी केली आहे.
यावेळी अंधश्रध्दा निर्मुलम समिती ने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे तसेच मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केलेले होते. परंतू अमोल काळे या संशयित आरोपीविरूद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपीविरूद्धही सीबीआयकडुन अद्यापही आरोपपत्र दाखलच करण्यात आलेले नाही.
या हत्येचा तपास डॉ. विरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खूनामागील नेमका सूत्रधार कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्याला असलेला धोका संपणार नाही. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे." या वेळी निवेदन देताना अं.नि.स.ची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनापर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा रायगड अं.नि.स.ने व्यक्त केली आहे.