TET Scam : 7 हजार 800 शिक्षक बोगस, सायबर पोलिसांचा मोठा खुलासा
गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच पुणे सायबर पोलिसांनी राज्यात 7 हजार 800 शिक्षक बोगस असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.
राज्यात आरोग्य भरती, म्हाडा पाठोपाठ टीईटी पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली होती. त्यातच पोलिस भरती परीक्षेतही पेपर फुटल्याचा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या सगळ्यांचा शोध घेत असताना राज्यात 7 हजार 800 शिक्षक बोगस असल्याचा खळबळजनक खुलासा पुणे सायबर पोलिसांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत अपात्र ठरवलेल्या 7 हजार 800 उमेदवारांना प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये रक्कम घेत पात्र ठरवल्याची खळबळजनक माहिती पुणे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्याबरोबरच 2018 साली झालेल्या परीक्षेतही उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचे समोर आले असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
आरोग्य भरती, म्हाडा पाठोपाठ टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. तर करोडो रुपये जप्त केले होते.
यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी मुळ निकाल आणि प्रत्यक्ष निकाल यांची पडताळणी केली. त्यात 2019-2020 च्या निकालात 16 हजार 592 उमेदवार पात्र ठरल्याचे दाखवण्यात आले होते. त्यांच्या निकालाची पडताळणी केल्यानंतर त्यापैकी 7 हजार 800 उमेदवार अपात्र असल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेपर 1 साठी एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील 10 हजार 87 जणांना पात्र ठरवण्यात आले होते. तसेच पेपर दोन साठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सहा हजार 105 उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी 7 हजार 800 उमेदवारांना अपात्र असतानाही पात्र ठरविण्यात आल्याने राज्यात 7 हजार 800 बोगस शिक्षक असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनूसार टीईटी परीक्षेत तीन प्रकारे गुण वाढविण्यात आले. त्यामध्ये ओएमआर शीटमध्ये बदल, थेट मिळालेल्या गुणांमध्ये बदल करणे आणि टीईटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे या पध्दतींचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात अनेक जणांना अटक होण्याची शक्यता पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.