पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार पण नियोजनाचा गोंधळ
पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याची तारीख सरकारने जाहीर केली. पण त्यासाठीच्या अटींवरुन मात्र संभ्रम वाढला आहे.;
कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शिक्षण विभागाची बैठक झाली, त्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोरोनाविषयक पुरेशी काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले. पण शाळा सुरू करताना पूर्व तयारी करणे, स्थानिक प्रशासनाचे त्याची जबाबदारी घेणे, पालकांची सहमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट याबद्दलची एसओपी नंतर जाहीर केली जाईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
एकीकडे शाळा सुरू करण्याची तारीख जाहीर केली गेली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाची जबाबदारी, पालकांची सहमती या अटीही सरकारने ठेवल्य़ा असल्याने नेमके नियोजन कसे होणार याबाबत संभ्रम दिसतो आहे. त्यात कोरोनावरील लस सगळ्यांना मिळण्यास बराच कालावधी जाणार आहे. त्यात १८ वर्षांखालील मुलांना लस दिली जाणार नाहीये, असेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकांपुढे आहे.
याआधीही नववी ते बारावीच्या शाळा सरकारने सुरू केल्या असल्या तरी काही ठिकाणी अजूनही पालकांनी मुलांना शाळेत न पाठवता ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे २७ जानेवारीला शाळा सुरू करण्याबाबत शाळा आणि पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.