प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी निरनिराळ्या भाज्यांची गरज- यशोमती ठाकूर

Update: 2021-08-15 07:48 GMT

अमरावती// निरोगी शरीरासाठी प्रतिकारशक्तीचे महत्व कोरोनाकाळाने अधोरेखित केले आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी आहारात निरनिराळ्या भाज्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणारा महोत्सव महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

अमरावती कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,यात रानभाजी महोत्सवाला भेट दिल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर बोलत होत्या.

या रानभाजी महोत्सवामध्ये मेळघाटसह विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, करटूले, शतावरी, भुई आवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर, आदी ५९ रानभाज्यांचे २८३ नमुने सादर करण्यात आले.

या रानभाज्यांची नागरिकांना ओळख व्हावी, त्यांचे महत्त्व पटावे यासाठी या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार रवी राणा यांनी या रानभाजी महोत्सवाला भेट दिली.

Tags:    

Similar News