५४२ एस. टी कर्मचाऱ्यांचे निलंबन; एस. टी कर्मचारी आक्रमक

Update: 2021-11-11 03:46 GMT

मुंबई  :  एस.टी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाने कारवाईत वाढ केली असून बुधवारी ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, दरम्यान दोन दिवसांत निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ९१८ झाल्याची माहिती आहे. सांगली विभागातील जत, पलूस, इस्लामपूर, आटपाडी या आगारातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, राज्यातील एस.टी सेवा ठप्प झाल्याने एस. टी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने आगारातून खासगी प्रवासी बसगाड्या, शालेय बस आणि अन्य खासगी वाहनांच्या माध्यमातून वाहतूक सुरू ठेवली आहे.

दरम्यान संपकरी एस.टी कर्मचाऱ्यांवर बुधवारी आणखी तीव्र कारवाई करण्यात आली असून ६४ आगारांतील ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यात सांगली विभागातील इस्लामपूर आणि आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील ४६

आणि यवतमाळ विभागातील विविध आगारांतील ४६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक विभागातीलही ४० कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. अन्य विभागांतही विविध कारवाया झाल्याचे महामंडळाने सांगितले.

दरम्यान मुंबईतील परळ, मुंबई सेन्ट्रल, परळ आगारातील एस.टीच्या चालक-वाहकांना मंगळवारी रात्री विश्रामकक्षातून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आणि कक्षांना कुलूप लावण्यात आले. हीच कारवाई महानगरातील अन्य आगारांतही झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्यासह फुटपाथवर रात्र काढावी लागल्याचे आंदोलकांनी सांगितले दरम्यान या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News