एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ ; 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार लाभ
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये देणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली.
कालच अहमदनगरच्या शेवगाव येथे झालेल्या एस. टी कर्मचाऱ्यांच्या विभागीय मेळाव्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर संपाचा इशारा देण्यात आला होता, आता एस.टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मात्र , एस. टी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांचे काय? असा सवाल एस. टी कर्मचारी उपस्थित करत आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाचा लाभ एस.टी महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणारा पगार यंदा नोव्हेंबरच्या 1 तारखेला होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अनिल परब यांनी आभार मानले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (#ST) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री @advanilparab यांनी केली. pic.twitter.com/owJ6t6BZlt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 25, 2021
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी एस.टी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या एस .टी कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे परब यांनी यावेळी सांगितले.