#RussiaUkraineConflict : युक्रेनचे ५० जण ठार तर रशियाच्या ५० घुसखोरांना मारल्याचा युक्रेनचा दावा

Update: 2022-02-24 13:49 GMT

रशियाने गुरूवारी सकाळी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्सकी यांच्या सल्लागाराने दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. तर दुसरीक़े एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार रशियाचे ५० घुसखोर ठार केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. पण हे ५० जण कुठे ठार झाले आहेत, याची सविस्तर माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली नाही. रशियाने गुरूवारी सकाळी युक्रेनच्या काही शहरांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण रशियाने आपण केवळ लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच देशासाठी जो लढण्यास तयार असेल त्याला शस्त्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे. तसेच अमेरिकेसह संयुक्त राष्ट्र संघटनेलाही युक्रेनने मदतीचे आवाहन केले आहे. युक्रेनने रशियासोबतचे सर्व राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत.

युक्रेनचे नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेपाचे आवाहन

दरम्यान युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे. मोदी यांनी पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्स्की यांच्यात मध्यस्थी करावी अशी विनंती केली आहे. युक्रेनमध्ये सध्या भारताचे अनेक विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. आम्हाला भारतात परत आणणे शक्य नसेल तर किमान सुरक्षित ठिकणी पोहोचवण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान नाटोने आपल्या ३० सदस्य राष्ट्रांची बैठक शुक्रवारी बोलावली आहे. या बैठकीत रशियाने युक्रेनच्या स्वायत्ततेवर केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी नवीन उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे. रशियाने लष्कराचा वापर करुन इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, पण नाटोने आता नवीन उपाययोजना अमलात आणून रशियाला उत्तर देण्याची तयारी केली आहे, अशी भूमिका नाटोचे सचिव जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.

Tags:    

Similar News