गुजरातमधील अहमदाबादमध्ये २००८ मध्ये सीरियल बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने ३८ जणांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. तर ११ आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये तब्बल २१ बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये ५६ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर जवळपास १४ वर्षे सुरू असलेल्या खटल्याचा निकाल अखेर लागला आहे.
८ फेब्रुवारी रोजी कोर्टाने ४९ आरोपींनी दोषी ठरवले होते. पण त्यांच्या शिक्षेचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सरकारी वकिलांनी कोर्टात युक्तीवाद करताना सर्व दोषींना फाशीची शिक्षा या खटल्यात एकूण ७७ आरोपी होते. त्यापैकी ४९ जणांना कोर्टाने दोषी ठरवले होते, तर २८ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर ४९ आरोपींना कोर्टात काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर कोर्टाने शिक्षा जाहीर केली, यात ३८ दोषींना फाशी तर ११ दोषींना जन्मठेपेची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांचा बली गेला होता. तसेच किमान २०० लोक जखमी झाले होते. कोर्टाने ही शिक्षा सुनावली तेव्हा सर्व आरोपी हे आभासी पद्धतीने हजर होते. सत्र न्यायालयाच्या फाशीच्या शिक्षेवर गुजरात हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्याशिवाय शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नाही. या आरोपींवर देशद्रोह, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या आणि हत्येचे प्रयत्न असे सर्व आरोप ठेवण्यात आले होते.