महावितरणाच्या दरवाढीचा फटका बसणार सर्वसामान्यांना...

राज्यातील सर्वसामान्यांना महावितरण झटका देण्याच्या तयारीत आहे. राज्यभरात ३७ टक्के वीज वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरण कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. अगोदरच सर्वसामान्यांचे महागाईमुळे कंबरडे मोडलेले असताना आता लवकरच नविन झटका मिळण्याची शक्यता आहे.

Update: 2023-01-28 10:40 GMT

राज्य सरकारी महावितरण कंपनी जवळपास १५०० कोटी रुपयांच्या आर्थिक तो़ट्यात सुरु आहे. कंपनीने हा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरण कंपनी आगामी काही दिवसात ३७ टक्के वीजदर वाढ करण्याची शक्यता आहे. आणि वरील तुट भरून काढण्याच्या तयारीत आहे. याबाबतचा प्रस्ताव महावितरण कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे साद केला आहे. या दरवाढीनंतर सन २०२४ ते २०२५ मध्ये आणखी १५ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणीतील नागरिकांना बसणार आहे.

राज्यातील वीज वितरण कंपनी ही ग्राहकांसाठी दर पाच वर्षांनी वीजेचे दर निश्चित करत असते. १ एप्रिल २०२० रोजी नवीन दर लागू करण्यात आले होते. मात्र या दरांचा मध्यकालीन आढावा घेतला जातो. त्यानुसार वरील दरवाढ प्रस्तावित आहे. मात्र ही दरवाढी यावेळी १ एप्रिल २०२३ पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र ही दरवाढ भरमसाठ असल्याचे दिसून येत आहे.

या नविन दरांनुसार घरगुती ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. सध्या घरगुती वीजेचा दर किमान ३.३६ रुपये प्रतियुनिट इतका आहे. तो एक एप्रिलपासून ४ रुपये ५० पैसे होण्याची शक्यता आहे. तर वीजेचा कमाल दर हा ११ रुपये ८६ पैसे इतका आहे. तो १६ रुपये ६० पैसे होण्याची शक्यता आहे. या दोन्ही विभागात वीज दर अनुक्रमे ५.१० रुपये तर १८.७० रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तावित आहे. व्यावसायिक श्रेणीतील ग्राहकांसाठीची ही वीजदरवाढ मोठा झटका असण्याची शक्यता आहे. किमान ७.०७ रुपये ते ९.६० रुपये प्रतियुनिटचा दर, आता १२.७६ रुपये ते १७.४० रुपये प्रतियुनिट इतका प्रस्तावित आहे.

ही वीज दरवाढ ग्राहकांना विचारात न घेता जर केली गेली तर ग्राहकांवर अन्याय होईल. त्यामुळे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ही दरवाढ करताना ग्राहकांचा विचार करणे गरजेचे आहे. दर पाच वर्षांनी होणारी दरवाढ यंदा अडीच वर्षातच होणार असल्याने ग्राहकराजा धास्तावला आहे. 

Tags:    

Similar News