गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. यामुळे झेनिथ धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. या धबधब्यावर गेलेले तीन पर्यटक गेले वाहून गेले आहेत. यामध्ये दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक लहान मुलगी बेपत्ता आहे. हवामान खात्याने 28 व 29 सप्टेंबर असे सलग दोन दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सकाळपासून खोपोली व जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. खोपोली शहरानजीक असलेल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर मंगळवारी पर्यटनासाठी 15 पर्यटक गेले होते. यामध्ये पुरुष, महिला व लहान मुलांचा समावेश होता, अचानक पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढला आहे. या प्रवाहात तिघेजण वाहून गेले आहेत. यापैकी मेहरबानू खान, वय ४0 वर्षे आणि रुबिना वेळेकर, 40 वर्षे यांचा मृत्यू झाला आहे. तर आलंमा खान ही 8 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. आपत्कालीन मदत टीम पाताळगंगा नदीच्या पात्रात बेपत्ता मुलीचा शोध घेत आहे.