जळगाव शहरात जनता कर्फ्यू, ३ दिवस कडक निर्बंध

Update: 2021-03-09 14:36 GMT

जळगाव - जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या तीन दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही केले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लादण्यात आली आहे.

जळगाव शहराच्या हद्दीत ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

काय बंद राहणार

जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने, अत्यावश्यक सेवा नसलेल्या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, उद्याने, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.

काय सुरू राहणार

वाहतूक, बस, रेल्वे, नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असेल. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही आवाहन करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News