उद्या बीड जिल्ह्यातील 2101 शाळांची वाजणार घंटा; शाळा खुल्या करण्यासाठी प्रशासन सज्ज
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने, आणि विद्यार्थ्यांचं होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून प्रत्यक्षात सकाळी आठ वाजता वर्ग भरणार आहेत, याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वच शाळांनी तयारी पूर्ण केली आहे.
शहरी भागातील 255 तर ग्रामीण भागातील 1846 शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरु होत असल्याने धूळखात पडलेल्या वर्ग खोल्यांची स्वच्छता केली जात आहे. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 चे वर्ग विद्यार्थ्यांची काळजी घेऊन सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून वर्ग सुरू केले जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी राज्य शासनाकडून घालून दिलेल्या कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने पालक तसेच विद्यार्थ्यांना केले आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोनाच्या भीतीपोटी पालकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या नेमकी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.