वर्षातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या दिवाळीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे औरंगाबाद शहरातील जवळपास सर्वच सराफा व्यावसायिकांच्या दुकानांत मंगळवारी गर्दी पाहायला मिळाली. एकट्या औरंगाबाद शहरात धनत्रयोदशीला सराफा बाजारात २०० ते २५० कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांच म्हणणे आहे.
गेल्यावर्षी कोरोनाची परिस्थिती आणि त्यामुळे सर्वच घटकांवर झालेली आर्थिक घसरण पाहता, सराफा बाजारातील उलाढाल कमी प्रमाणात पाहायला मिळाली होती. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे यावर्षी दिवाळी निमित्ताने सोनं-चांदी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यातच सोन्याचे दर सध्या स्थिर असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी पसंती दिली आहे.
औरंगाबादमध्ये मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९ हजार ३५० रुपये तर २२ कॅरेट भाव प्रति दहा ग्रॅम ४६ हजार ९० एवढा होता. चांदीचा भाव प्रतिकिलो ६६ हजार २०० रुपये होता. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शहागंज येथील सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी होती. तसेच ग्रामीण भागात सुद्धा सराफा दुकांनामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळाली.