साडेतीन वर्षात पावणेदोन लाख किलो प्लॅस्टिक जप्त, मुंबई महापालिकेची कारवाई
जून 2018 ते जानेवारी 2022 या काळात मुंबईत पावणेदोन लाख किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
जून 2018 मध्ये तात्कालिन राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बंदी असतानाही अनेक लोक प्रतिबंधीत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईत साडेतीन वर्षात तब्बल पावणे दोन लाख किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असताना तात्कालिन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक लोक या निर्णयाची पायमल्ली करत सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर करत होते. त्यामुळे राज्य सरकारने प्रतिबंधीत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली. तर त्यामध्ये गेल्या साडेतीन वर्षात मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईत पावणे दोन लाख किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
जून 2018 ते जानेवारी 2022 या कालावधीत मुंबई महापालिकेने प्रतिबंधीत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले होते. त्यामध्ये साडेतीन वर्षात 1 लाख 75 हजार 428 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईच्या माध्यमातून 5 कोटी 36 लाख 85 हजार इतकी दंड वसूली करण्यात आली. याबरोबरच आता यापुढेही चांगल्या पर्यावरणासाठी मुंबई महापालिकेने सातत्याने करण्यात येणाऱ्या कारवाईचा भाग म्हणून प्रतिबंधीत प्लॅस्टिक विरोधी कारवाई आता अधिक प्रभावी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व नागरिक, फेरीवाले, व्यापारी यांसह सर्वांना प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकपासून बनवल्या जाणा-या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रानुसार प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर टाळण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.