गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस 14 मार्ग बंद

पावसामुळे भामरागड तालुक्यातील 128 गावांचा संपर्क तुटला

Update: 2024-07-21 04:51 GMT

गडचिरोली:- रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे.यामुळे 14 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 128 गावांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे.

मागील 24 तासात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्या खालोखाल कुरखेडा तालुक्यात 116.6 मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 पैकी 27 दरवाजे उघडण्यात आले असून येथून 3 हजार 33 क्युमेक्स तर तेलंगाना राज्यातील मेडीगड्डा बेरीज मधून 10 हजार 576 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसेखुर्द धरणातून पाच हजार क्यूमेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याने नदी काठावरील गावकऱ्यांनी सतर्क रहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सिक्चे संकेत दिले आहेत.

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आलापल्ली ते भामरागड आणि आलापल्ली ते सिरोंचा ही दोन्ही राष्ट्रीय महामार्ग आजही बंद असून रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवासी देखील अडकले आहेत. सध्या दक्षिण भागात अजूनही पावसाचा कहर सुरूच असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

14 मार्गावरील वाहतूक झाली ठप्प

भामरागड नजीकच्या परलाकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने येथे बॅरिकेट लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुरामुळे आलापल्ली-भामरागड, भामरागड-एटापल्ली, अहेरी-मोयाबिन पेठा,कुरखेडा-चारभट्टी, आलापल्ली- सिरोंचा, जारावंडी ते पाखंजूर, पोरला-वडधा, वैरागड-शंकरपूर, कुरखेडा-वैरागड, कारवाफा-पाटेगाव, मालेवाडा-खोब्रामेंढा, गोठणगाव- सोनसरी, देसाईगंज-आंधळी, लखमापूर बोरी-गणपुर या 14 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

Tags:    

Similar News