राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाययोजनांकरीता आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ही माहिती दिली आहे. प्रत्येक आमदाराला आपाल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येऊ शकणार आहे. पुण्यात पार पडलेल्या कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागरिकांनी लॉकडाऊनचे निर्बंध न पाळल्यास लॉकडाउन कडक करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी संप न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टरांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढू पण डॉक्टरांनी संप केलाच तर सरकारला देखील काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्याचबरोबरक प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत पण डॅाक्टर रेमडेसिवीर आणायला सांगतात आणि मग पेशंट खासदार आमदारांना फोन करायला लागतात, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आरोग्य यंत्रणा कोलमडलेली नाही, यंत्रणेला नाउमेद करू नका, सगळे काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले. लसीकरण जेवढे करता येतील तेवढे करा, रोज 1 लाख लसीकरण करण्यासाठी आमची यंत्रणा तयार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या निवडणूकीत कोरोना रुग्ण वाढले तर आम्ही जबाबदार असलो तरी केंद्राने निर्णय घेतला आहे आणि प्रचार घरात बसून करता येत नाही, आम्ही सर्व काळजी घेत आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.