31 डिसेंबरचे सेलिब्रेशन यंदा घरीच, मार्गदर्शक सूचना जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी सरकारतर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.;
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर राज्यातही खबरदारी म्हणून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण शिवाय आता नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहावरही यंदा कोरोनाचे सावट असल्याने सरकारतर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
31 डिसेंबरसाठी हे नियम पाळा
- ३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. १ जानेवारी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
- ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याची खबरदारी घ्यावी.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नववर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
- कोविड-१९ या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.