किरीट सोमय्या अडचणीत, INS प्रकरणी गुन्हा दाखल
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यातच ED ने शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्याच्या दोन दिवसाच्या आत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.;
राज्यात भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष टीपेला पोहचला आहे. दररोज पत्रकार परिषदांमधून आरोप प्रत्यारोपांची राळ उडवून दिली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा देशद्रोह असल्याने किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली होती. त्याप्रकरणी मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आळा आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 420,406 आणि 34 अंतर्गत माजी सैनिक बबन भोसले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
ED ने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी सोमय्या यांनी चळवळ उभी केली होती. तर या चळवळीच्या माध्यातून सोमय्या यांनी 57 कोटी रुपये जमा केले होते. ही रक्कम राजभवन येथे जमा करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. मात्र राजभवनला माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली असता अशा प्रकारे निधी राजभवनकडे जमा झाला नसल्याची माहिती समोर आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तर हा पैसा किरीट सोमय्या यांनी पुत्र नील सोमय्या आणि आपल्या व्यावसायात वळवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.