प्रियंका गांधींच्या 'लडकी हू, लढ सकती हू' घोषणेनंतर राज्यात काँग्रेसचा मोठा निर्णय
काँग्रेसकड़ून महिलांचा सन्मान, जिल्हा काँग्रेस कमिटीत नेमणार एक महिला कार्याध्यक्ष, नाना पटोलेंची घोषणा;
उत्तरप्रदेश निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जाहीर केले. तर 'लडकी हूँ, लड सकती हूँ' हे अभियान काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. या अभियानाला राज्यातून बळ देण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने उत्तरप्रदेशात 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. तर उत्तरप्रदेश निवडणूकीचा चेहरा म्हणून प्रियंका गांधी पुढे आल्या आहेत. त्यातच उत्तरप्रदेशसाठी 'लडकी हूँ, लड सकती हूँ' हे अभियान काँग्रेसकडून जोरदार पध्दतीने राबवण्यात येत आहे. तर या अभियानाला बळ देण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्येक जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीवर एक महिला कार्याध्यक्ष नेमण्याची घोषणा केली.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान केला आहे. तर पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे महिलांचा राजकारणातील सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन महिलांना मकरसंक्रांतीची अनोखी भेट देत असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत महिलांना 40 टक्के जागांवर उमेदवारी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. तसेच 'लडकी हूँ' लड सकती हूँ', ही घोषणा देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
त्यामुळे महिलांचा निर्णयप्रक्रीयेत सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.