प्रवाहपतित पत्रकारिता अन उथळ नव पत्रकार ! पुरुषोत्तम आवारे पाटील
माध्यमांचे स्वरूप बदलले की त्यात काम करणाऱ्या लोकांनाही आपल्या कामाची दिशा बदलावी लागत असते. बदलत्या काळासोबत ज्यांना जुळवून घेता येत नसते त्यांना काळ प्रवाहाच्या बाहेर फेकत असतो,प्रवाहपतित पत्रकारिता अन उथळ नव पत्रकारीतेबद्दल ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केलेलं परखड भाष्य...;
माध्यमांना बदलत्या तंत्र ज्ञानाशी स्पर्धा करण्यासोबतच मार्केटिंग मध्ये सुद्धा अग्रेसर राहण्याची गरज असते त्यासाठी बाजारातील स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे कसे राहता येईल याचे नियोजन करावे लागते. नव्वदच्या दशकातील टीव्ही आठवून बघा ,आणि आताच्या काळातील तेच सरकारी दूरदर्शन बघा . स्थिती एकदम बदलली आहे. त्याहीपेक्षा जास्त बदल मुद्रित माध्यमांच्या क्षेत्रात झालेले दिसतात. वृत्तपत्रे कार्यालये,मनुष्यबळ आणि यंत्रणा या बाबतीत खूपच पुढे गेली आहेत. इंटरनेट नसण्याचा काळ आणि सध्याचा काळ यांची कोणत्याच बाबतीत तुलना होऊ शकणार नाही अश्या अवस्थेत वृत्तपत्रे आली आहेत. तंत्रज्ञान,कार्यपद्धती बदलली की त्यात राबणाऱ्या लोकांना मानसिकता सुद्धा बदलावी लागते.
मानसिकता बदलणे म्हणजे कर्तव्याच्या नावावर पाट्या टाकणे ,अगदी ''दिन जावं पैसा आव '' असे करणे नव्हे. जे काम आपल्या वाट्याला आले असेल ते करण्यासाठी पूर्ण झोकून देणे आणि आपण केलेल्या कामाचे बरे,वाईट परिणाम सहन करण्याची तयारी ठेवणे हा मानसिकता बदल असू शकतो. अलीकडे त्याचे संदर्भ नव्या पिढीच्या पत्रकारांनी आपल्या कामातून बदलून टाकले आहेत. पूर्वीपेक्षा वृत्तपत्रे अधिक आधुनिक आणि खर्चिक झाली आहेत , पत्रकारांच्या पगाराच्या बाबतीत सुद्धा सुधारणा झाल्या आहेत मात्र मिळणाऱ्या मोबदल्यात शंभर टक्के परतावा देण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसत आहे. त्याचा परिणाम असा झाला की विदर्भात गेल्या वीस वर्षात शोध पत्रकारिता,सामाजिक पत्रकारिता नामशेष झाली आहे. पायाला भिंगरी असलेले पत्रकार आता शहरात आणि गावठी मिळेनासे झाले आहेत. सारी दुनिया मोबाईलच्या माध्यमातून मुठीत आल्यानंतर मेहनती पत्रकार सुद्धा रेडिमेड मजकुराच्या आहारी गेले आहेत.
सोशल मीडियावर रेडिमेड मजकूर उपलब्ध होणे ही आजच्या पत्रकारितेची गरज नाही ती कुणीतरी स्वतःच्या सुविधेसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. कार्पोरेट जगतात त्याला ''पीआर'' असे संबोधले जाते परिणामी आजची बहुतांश माध्यमे या पीआरच्या जाळयात ओढली गेली आहेत. कॉर्पोरेट कंपन्या,मोठ्या शिक्षण संस्था आणि सरकारी अनुदानावर काम करणाऱ्या कथित सामाजिक संस्था त्यांना हवा तसा मजकूर तयार करून मेल करतात आणि दुर्दैवाने त्यातील कानामात्रा सुद्धा न बदलता तो मजकूर दुसऱ्या दिवशीच्या अंकात प्रेषित होताना आपण बघत असतो. भांडवलशाही किंवा कॉर्पोरेट जगत त्याला अपेक्षित असा मजकूर श्रमिकांच्या सुद्धा माध्यमातून अश्या पद्धतीने छापून आणू शकतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अलीकडे जाहिरात पार्टीची बातमी या नावाचा प्रकार अतिशय प्रभावी बनला असून संपादकीय विभागापेक्षा मार्केटींग विभाग शिरजोर बनला आहे कारण त्याचे उत्पादक मूल्य अधिक असते.
जिल्हास्तरावरील बातमीदार आणि उपसंपादक वर्षानुवर्षे केवळ कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यात व्यस्त आहेत. बातमीमागील बातमी शोधण्याची दृष्टी त्यांनी वापर न केल्यामुळे गमावली आहे. अलीकडे म्हणूनच पाच पन्नास लोकांच्या उपस्थितीतले कार्यक्रम सुद्धा सोहळे होतात आणि दहा पाच लोक जिथे रक्तदान करतात ते शिबीरही भव्य रक्तदान शिबीर म्हणून पार पडत असते. ज्या मजकुराचे पत्रक काढले तरी ते छापून येऊ शकते त्याबाबत अलीकडे सगळ्याच क्षेत्रातील लोक पत्रकार परिषदा घ्यायला लागले आहेत. कोणत्याही विषयावर पत्रपरिषद घेतली की त्याची बातमी छापणे बंधनकारक असल्याचा गोड गैरसमज आयोजकांना निर्माण करून देण्यात काही पत्रकार यशस्वी झाले आहेत. जिल्हा स्तरावर होणाऱ्या ओल्या पत्रपरिषदा यांची संख्या मर्यादित असली तरी त्याच्याकडे डोळे लावून बसलेले कथित पत्रकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःची किंमत एका क्वार्टर वर आणून ठेवल्याने नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारण्याची क्षमता संपुष्टात आली आहे.
सगळ्या क्षेत्रात आत मध्ये काय चालते हे सहज कुणीही सांगत नाही त्यासाठी अण्णा हजारेंनी पत्रकारांना माहिती अधिकार सारखे प्रभावी हत्यार दिले असताना त्याचा वापर केवळ दोन टक्के पत्रकार करतात आणि त्यालाच उदरनिर्वाहाचे साधन ज्यांनी बनविले ते अनेक कथित सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार तज्ञ म्हणून मिरवत असतात. जाहिरातीचे टार्गेट आणि संबंध जोपासण्याच्याअट्टाहासापायी अलीकडे नेते किंवा कोणत्याच उपक्रमाची चिकित्सा केली जात नाही. वाचकांना खऱ्या वार्तांकन पासून दूर ठेवले जात आहे. गल्लीतला नगरसेवक असो की मतदार संघाचा आमदार त्याने किंवा चेल्या चपाट्यानी केलेले अतिक्रमण,बेईमानी ,भ्रष्टाचार ,गुंडगिरी याची बातमी कधीच होत नाही. हे असेच चालत असते हा संस्कार जुने पत्रकार नव्यांच्या डोक्यात घालतात त्यामुळे सत्य लिहिणे म्हणजे कुणाच्यातरी विरोधात लिहिणे असते यावर नवपत्रकारांचा दृढ विश्वास बसला आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील