निर्भया प्रकरणातील आरोपींना अखेर आज फासावर चढवण्यात आले. त्याआधी दिल्ली हायकोर्टाने या आरोपींची याचिका फेटाळल्यानंतर जेल प्रशासनानं या चौघांना त्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर हे सर्व आरोपी ढसाढसा रडू लागले. तसंच त्यांनी संध्याकाळचा चहासुद्धा घेतला नाही. आज पहाटे फाशी देण्यापूर्वी देखील या चौघांनी मोठ्यानं रडून, ओरडून फाशीला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
पहाटे ३.३० वाजता या चौघांना जेल अधिकाऱ्यांनी उठवलं. हे चारही आरोपी रात्रभर झोपू शकले नाहीत. त्यानंतर फाशी आधीच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना अंघोळ करण्यास सांगण्यात आले. त्यांच्यासाठी चहा मागवण्यात आला. या सगळ्यांना त्यांची अखेरची इच्छा विचारण्यात आली, पण त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही. त्यानंतर या चौघांना पांढरे कपडे घालून आणि हात बांधून फाशी घरात नेण्यात आले. तिथेही जातांना या नराधमांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या तोंडावर काळा कपडा घालण्यात आला आणि मग चौघांनाही एकाचवेळी फासावर चढवण्यात आहे.
जेलच्या नियमानुसार या चौघांनाही ३० मिनिटं फासावर लटकावलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले आणि मग डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, त्यानंतर त्यांचं शवविच्छेदन केले जाईल. दरम्यान या चारही दोषींनी तुरुंगात केलेल्या कामातून मिळालेले पैसे त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.