चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील मुलींच्या लैगिक शोषण घटनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांना ३० एप्रिल रोजी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात व्यक्तिशः हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. त्यामुळे जीभ सैल सोडणा-या आमदारांना चांगलीच चपराक बसली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश स्कुलच्या वसतिगृहात झालेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्य महिला आयोगाने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी शासकीय मदत मिळवण्याच्या हेतूनेच पिडित मुलींच्या पालकांकडून पोलीसांत तक्रारी दाख केल्या जात असल्याचे वक्तव्य आमदार बाळू धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. हे विधान अल्पवयीन मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या हेतूंवर संशय घेणारे असून हे वक्तव्य अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे आयोगाने आमदारांना पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे.
तसेच अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या तक्रारींची सत्यता पडताळण्याचे काम संबंधित तपास यंत्रणांचे व न्यायपालिकेचे आहे. त्यांचा तपास पूर्ण होण्याआधीच आपण उपरोक्त प्रतिक्रिया देणे, वक्तव्य करणे, ही बाब अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची अवहेलना करणारी असल्याचे आयोगाचे म्हणणे असून यासंदर्भात ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सदर आमदारांना आणि धोटे यांना प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.